Thursday, April 14, 2011

वैशाख वणवा

वैशाख वणवा
कधी संपणार हा वैशाख वणवा
कधी संपणार पोटाची वानवा
कधी जातील मुलांच्या पोटी सुखाचे चार घास
कधी थांबणार घरघर लागलेली या जीवा?

कधी थांबणार चाकरीसाठी वणवण
कधी लाभणार जीवास आराम एक क्षण
अन कधी तुटणार गळयामधली-
हि काटेरी जीवघेणी पैंजण?

सांगा केली काय आम्ही चूक?
कटी दिवस राहायचे असेच मूक?
राब-राब राबून तुमच्या पोटा-पाण्याची व्यवस्था केली-
म्हणूनच का न भागावी आमच्या पोटातली भूक?

कितीकदा लावायची धोतराला ठिगळ,
किती दिवस घालायची कारभारणीनं विटलेली पातळ?
तुमच्या शेले-शालीसाठी कापूस पिकवताना-
आम्हाला मुलांच्या चड्डीसाठी का फिरावे लागावे आकाश-पाताळ

आता यावरी एकच दिसतो उपाय-
बायकापोरं करतील थोडे दिवस हाय-हाय
पण त्यांच्या दोन वेळच्या भातासाठी-
आम्हाला जीव देण्यापरीस उपायच काय?

नका थट्टा करू हो,आतातरी जीवाची-
नसे जनाची तरी, लाज ठेवा मनाची
नका मिरवू तुमचे ते पोकळ पेकेज अन,
नका देऊ तुमची ती सुवर्णपदक 'चांदीची' !(?)

नाही संपणार हा वैशाख वणवा
नाही संपणार पोटाची वानवा
आयुष्यभर तुमची भरली जरी पोटं
नाही थांबणार घरघर लागलेली या जीव?

कारण.........
या देशाला अजूनही फितुरीचा शाप आहे,
अन लोकशाहीच्या आड "हुकुमशाहीचा" उच्छाद आहे!

No comments:

Post a Comment