Tuesday, October 26, 2010

एकदा देव माझ्या भक्तीने प्रसन्न झाला

एकदा  देव  माझ्या  भक्तीने 
प्रसन्न झाला 
‘मागून  घे  तुझ्या  आयुष्यातले 
सर्वात  मोठे  सुख ’ म्हणाला,

 मी  म्हणाले ,’मला  असे  सुख  नको 
जे  दु:खालाही  घेऊन  येईल,
असेही  सुख  नको 
जे  मला  माझ्यापासूनच  दूर  नेईल ’,

‘मला  असे  सुख  नको 
ज्याचे  मला  नवलच राहणार  नाही ,
इतके  सुख  नको 
ज्यामुळे  मला  दुसर्याच्या  वेदना  सुद्धा  कळणार  नाही ’,

‘मला  अशी  तृप्ती  नको 
जी  नव्या  अतृप्तीला  जन्म देईल ,
अशी  विश्रांती  नको 
जी  मेहनतीची  मजाच  हिरावून  नेईल ’,

‘मला  असे  सुख  दे 
ज्याला  दुखाची  झालर  राहील ,
असे  आणि  इतकेच  सुख  दे - 
थोडे  पूर्ण -थोडे  अपूर्ण  आयुष्याचे  गणित  राहील ’,

‘मला  दे  असे  समाधान 
जे  जन्मभर  तसेच  राहील ,
सारे  सोडून  गेल्यावरही  
शेवटपर्यंत  साथ  देईल …….....

Monday, October 25, 2010

आयुष्यात आपण सारे


आयुष्यात आपण सारे 
फक्त काही काळ खरे असतो
मग चालू होतो आपला
अस्तित्वासाठी लढा 
बसू लागतात आपल्याला-
वास्तवाचे चटके
सुरु होतो आपला आपल्याशीच 
मानापमानाचा खेळ..............
अन मग पळू लागतो आपणच 
आपल्यापासून दूर...............
दूर........दूर.........अजूनच दूर..............